“जामसावळी हनुमान मंदिर – श्रद्धा आणि शांततेचं ठिकाण”

 

 जामसावळी हनुमान मंदिर – माहिती 

चमत्कारिक जामसावळी..!

भारतात हनुमानाची अनेक प्राचीन आणि जागृत असलेली प्रसिद्ध मंदिरे आहेत. अशी अनेक मंदिरे आजही नागपूर आणि आसपासच्या परिसरात बघायला मिळतात. प्रामुख्याने नागपुरातील तीनशे वर्षापूर्वीचे राजबाक्षाचे मेडिकल चौकातील मंदिर, सेमिनरी हिल्सला असलेले तेलंखेडीचे हनुमान मंदिर आणि नंदनवन जवळचे रमणा मारोती मंदिर अशी काही जागृत मंदिरे भक्तिभावाने फुलून जातात.वनपुत्र केसरीनंदन आणि अंजनीपुत्र हनुमान हे मानव योनीत वावरत असतात आणि म्हणूनच कित्येकांना त्यांचे दर्शन झाल्याच्या शेकडो कथा आजही अस्तित्वात आहेत. अचानक दुपारी झालेले दर्शन, रात्रीचे दर्शन आणि गर्दीतल्या दर्शनाच्या अनेक कथा नागपुरात घरो घरी ऐकायला मिळतात. या बद्दलचा एक प्रसिद्ध श्लोक आहे –

“अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषण:
कृप: परशुरामश्च सप्तते चिरंजीवीन:”


सप्तचिरंजीवींपैकी हनुमान, अश्वत्थामा, बली आणि परशुराम यांचे अस्तित्व इहलोकातल्या मानव योनीत असून ते चिरंजीव म्हणजे जीवंत आहेत अशी प्राचीन पारंपरिक मान्यता आहे. म्हणूनच ते मानव योनीत जमिनीवर आपल्या अनेक निवासस्थानावर वावरून मनुष्याच्या संपर्कात असतात आणि दर्शन देतात असे म्हटल्या जाते. व्यास, बिभिषण आणि कृपाचार्य यांचा माणसांच्या दैनिक जीवनाशी संबंध येत नाही.

मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौंसर या तहसीलमध्ये ‘जामसावळी’ नावाचे एक लहानसे गाव आहे. सौंसरपासून आठ किलोमीटर आणि नागपूरपासून ७० किलोमीटर असे अंतर आहे. ‘जाम’ आणि ‘सर्पिणी’ नदीच्या संगमा जवळ ‘सावळी’ हे गाव आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातल्या सीमेवर हे सातपुडा पर्वताच्या शृंखलेच्या सानिध्यात हे निसर्गरम्य टुमदार गाव आहे. हे धार्मिक क्षेत्र म्हणजे रामायणातल्या प्राचीन दंडकारण्याचा हा भाग आहे. या सावळी गावात लोटलेल्या अवस्थेत असलेल्या हनुमानाची प्रचंड मोठी पुरातन मूर्ती आहे. ही हनुमंताची शयनमुद्रा आहे. दोन राज्याच्या सीमेवरचे हे जागृत ठिकाण असून दोन्ही राज्यातून भाविकांचा दर्शनाकरिता सतत ओघ सुरू असतो. या मंदिरात शनिवार आणि मंगळवारी नियमित जाणारे अनेक भक्त या दोन्ही राज्यात आहेत.

मारुती म्हणजेच हनुमान असून हनुमानाचे लहानपणाचे पहिले खरे नाव ‘मारुती’ आहे. वडिलांच्या ‘मरुत’ या नावावरून हे नाव पडले आहे. सूर्याला फळ समजून मारुती उड्डाण करून ते गिळायला गेला आणि सूर्यासोबत खेळ करायला लागला. सूर्याला पकडताच त्याचे हात आगीने होरपळायला लागले. हे बघून इंद्राने पृथ्वीला आणि सूर्याला वाचविण्याकरिता आपले वज्र मारुतीच्या दिशेने भिरकावले आणि ते मारुतीच्या “हनुवटी’ला लागून मारूतीचे तोंड वेडेवाकडे झाले आणि तो बेशुद्ध पडला. त्यावेळेपासून मारुतीला लोक ‘हनुमान’ म्हणायला लागले.

१९९६ साली सावनेरपासून जामसावळी या हनुमानाच्या मंदिरात जाताना जंगलातून आणि कापसाच्या- तुरीच्या शेंगा तोडत शेतातून जात होतो. त्यानंतर अनेकदा जाणे झाले. मुख्य सडकेपासून तीन किलोमीटरच्या आत एका मोठ्या पिंपळाच्या वटवृक्षाच्या छायेत एका टीनाच्या पत्र्याखाली हे लहानसे मंदिर होते. मुख्य सडकेपासून मंदिरापर्यंत कापसाच्या शेतातून तुरीच्या शेंगा तोडत पायी चालण्याची मजा काही औरच होती. केवळ चार-पाच पूजेची दुकाने या भव्य परिसरात होती आणि सायंकाळनंतर मंदिर बंद होत असे आणि अंधारात परिवर्तीत होत असे. आज हे दृश्य दिसत नाही. भक्ति, आस्था, श्रद्धा आणि प्रचारामुळे येथे आता भरपूर विकास कामे झालेली आहेत. यज्ञ शाळा, गोशाळा, धर्मशाळा,प्रसाद कक्ष, भव्य सभागृह मंडप, रसोडा, पुजेची आकर्षक सजलेली दुकाने, विशाल पार्किंग प्रचंड गर्दीमुळे आवश्यक झाले आहे. काळानुरूप बदल होत आहे. शेत आणि जंगल आज नष्ट झालेले असून त्या ठिकाणी मोठे मोठे आकर्षक रस्ते आणि सुंदर स्वागतद्वार -प्रवेशद्वार झालेले आहे.

रस्त्याचे दोन भाग झालेले असून प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत रस्त्यांच्या मधोमध हनुमान चालीसेच्या स्तोत्रांचे सुंदर फलक लागलेले दिसतात. आज येथे भक्तांच्या मुक्कामाकरिता ‘भक्तिनिवास’ची आणि भोजनाची व्यवस्था झालेली आहे. एकुणच आता मंदिर व्यवस्थापने कात टाकलेली असून आधुनिकतेकडे व्यवस्थापन वाटचाल करीत असल्याचे बघायला मिळते. जाम नावाची नदी असलेले हे लहानसे वेगळे गाव असून सावली हे त्याला लागुनच असलेले जवळचे गाव आहे. या दोन्ही गावाला जोडले आहे ते स्वयंभु ‘मारूती’ने आणि गावाचे नाव झाले ‘जामसावळी’ ..! हा जामसावळीचा हनुमान अत्यंत चमत्कारिक असून ही मूर्ती किती जुनी आहे, याची आजही कुणालाच कल्पना नाही. या बाबतीत अनेक गावात लोककथा आणि काही दंत कथा प्रचलित असून आजही त्या खर्‍या मानल्या जातात. यातल्या बहुतांश कथा “चोरी” या घटनेशी निगडीत आहे असे दिसून येते.

“जाम” नावाची नदी असलेल्या गावात एका हनुमान भक्ताचे घर होते आणि हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री तो आपल्या हनुमान भक्तित रात्रभर चांगलाच तल्लीन झालेला होता. समोर हनुमानाची प्रतिमा होती आणि त्या समोर तो देहभान विसरून डोळे मिटुन त्याचे स्तोत्र पठन सुरू होते. त्याच वेळेस काही चोरांनी चोरीच्या उद्देशाने मागच्या बाजुने घरात प्रवेश केला आणि चोरी करून पळून जायला लागले. भक्ताला याची काहीच कल्पना नव्हती. परंतु हनुमान हे सर्व काही बघत होते. चोर पळत होते. त्याच वेळेस हनुमंत जागृत झाले आणि मुळ स्वरुपात ते चोरांच्या मागे धावायला लागले आणि त्यांचा पाठलाग करता करता स्वतःच्या शरीराचा आकार मोठा मोठा करत ते सावळीपर्यंत आले आणि जमिनीवर झडप घालून या वृक्षाखाली त्यांनी धावत्या चोरांचे पाय पकडले. त्याच अवस्थेत त्यांना वृक्षामध्ये प्रभू रामचंद्र दिसायला लागले आणि ते भक्तीत मग्न झाले आणि आजपर्यंत ही लेटलेली शयन अवस्था अशीच कायम आहे. हा पिंपळ वृक्ष म्हणजे प्रत्यक्ष रामाचे स्वरूप असून हनुमंत त्यांच्या चरणाशी लीन झालेले आहेत.

दुसरी लोककथा अशी सांगितल्या जाते की, या शेतात हनुमानाची प्रचंड मोठी उभी मूर्ती होती. ही स्वयंभू मूर्ती कधी प्रकट झाली हे आजही कुणी जाणत नाही. यामूर्ती खाली आणि जवळपास प्रचंड गुप्तधन म्हणजे सोने, चांदी, दागिने हे लपवून ठेवलेले आहे अशी माहिती चोरांना कळली. पण ही प्रचंड मूर्ती हालवायची कशी हा त्यांना प्रश्न पडला. ही मूर्ती हलविण्याकरिता त्यांनी वीस बैलजोड्या रात्रीच्या अंधारात आणल्या आणि त्यांच्या सहाय्याने ही मूर्ती आडवी करून लेटलेल्या अवस्थेत ठेवली. दुसर्‍यांदा हि मूर्ती उचलल्या गेली नाही आणि ती त्याच अवस्थेतच आहे. तर चोरांनी चोरी करू नये म्हणून हनुमान स्वत:हुनच ते या गुप्तधनावर आडवे झाले आणि गुप्तधन चोरी होण्यापासून वाचविले असेही सांगितले जाते. या ठिकाणी प्रचंड मोठे पिंपळाचे झाड असून त्याखाली हनुमंत लेटुन विश्राम करत आहेत. या मंदीरासमोरच एक मोठा पर्वत असून त्याला द्रोणागिरी पर्वताचा अंश मानला जातो. या पवित्र पर्वताची परिक्रमासुद्धा भाविक करतात. संजीवनी बुटीचा द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेत नेताना शक्ति आणि ऊर्जेचे प्रतीक असलेल्या हनुमंताने सावळी गावात हा पर्वत ठेऊन काही काळ विश्राम केलेला होता अशीही आख्यायिका आहे. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेले ‘रामटेक’ हे सुद्धा जवळच असून जामसावळीपासून रामटेकपर्यंत दिंडी काढली जाते. अर्थात जेथे राम तेथे हनुमान हे समीकरण आलेच.

या हनुमानाची चमत्कारिक गोष्ट अशी की या मूर्तीच्या नाभीतून सतत जलप्रवाह होतो. हे जल तीर्थाच्या रूपाने भाविक प्राशन करून अनेक असाध्य रोग, शारीरिक विकलांगता, मानसिक रोगी आणि अनेक आजारांनी जडलेले लोक हे जल प्राशन करतात. बाहेरची भुतबाधा, अंगात येणे, स्वत:चे भान नसणारे अनेक लोक मूर्ती समोर एका ‘वेगळ्याच भान नसलेल्या’ अवस्थेत वावरत असतात. भुतप्रेतांनी झपाटलेल्या या लोकांचे हे दृश्य मनाला विचलित करणारे असते. ते कधीच मूर्तीपर्यंत जात नाहीत. पण या सर्वांना रोगमुक्त करून हनुमंत या सर्वांना आपल्या कवेत घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

रोज पहाटे चार वाजताच्या प्रसन्न वातावरणात पंचामृतांनी हनुमानाचे स्नान व अभिषेक होतो. मग शृंगार होतो. मस्तकावर चांदीचा मुकुट आणि बाजूला गदा असते. मग वाद्यवृंदाच्या गजरात आरती होते. सायंकाळी पण आरती होते. हनुमंत हे बाल ब्रम्हचारी असल्याने स्त्रियांना दुरूनच दर्शन घेता येते. अनेक लोक येथे राहून चाळीस दिवसाचे अनुष्ठान करतात. महाभारताच्या कथेनुसार याच ठिकाणी हनुमंताने भीमाचे आणि त्याच्या शक्तीचे गर्वहरण केलेलं होते असेही सांगितले जाते.

असा हा जामसावळीचा रामायण आणि महाभारत काळातला भक्तिमय परिसर.!
चमत्कारिक जामसावळीचा चमत्कारिक हनुमान!

📍 मंदिराचे स्थान

  • हे मंदिर जामसावळी गावात वसलेले आहे.
  • गावाच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे येथे आध्यात्मिक वातावरण जाणवते.

 धार्मिक महत्त्व

  • मंदिरात भगवान हनुमान (मारुती) यांची मूर्ती आहे.
  • भक्तांच्या मते येथे प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण होतात.
  • संकटांपासून संरक्षण मिळावे म्हणून लोक येथे दर्शन घेतात.

 पूजाअर्चा व परंपरा

  • दररोज पूजा, आरती आणि भजन केले जाते.
  • मंगळवार आणि शनिवार या दिवशी विशेष गर्दी असते.
  • हनुमान जयंतीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

 वातावरण व वैशिष्ट्ये

  • मंदिर परिसर स्वच्छ, शांत आणि निसर्गाने वेढलेला आहे.
  • भक्तांना येथे बसून ध्यान करण्यासाठी उत्तम जागा मिळते.
  • गावातील लोक मंदिराच्या देखभालीत सक्रिय सहभाग घेतात.

0 Comments